Friday, January 29, 2016

तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे. .

तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे. .
उन्हे गात होती जरी त्याक्षणी
तश्यातच मला भेटलेली कुणी 
जरा सावळीशी तनू लाजरी
किती बोलली फक्त नजरेतुनी…
तिचे पास येणे जरी थोडके
जसे सोबती अंतराचे धुके
असा हरवलो त्या क्षणातून मी
तिला पाहतानाच स्पंदन चुके…
तिचा हाती हाती तरी घेतला
खुळा स्पर्श झाला शहा-यातला
उन्हे पेटली भर दुपारी तरी,
इथे मात्र हा गारवा वाढला...
तशी वेळ ती फक्त दोघातली
म्हणूनच मिठीला मिठी मारली
तिच्या बाहुपाशी असा गुंतलो
जणू गाठ रेशिम कुणी बांधली…
फुले श्वास, रोमांच देहावरी
तरी सोडवेना मिठी भरजरी
जरी या क्षणा आठवू पाहतो
तरी आठवे ती मला लाजरी...
खुले केस पाठीवरी सोडूनी
मला भासली ती जणू कामिनी
तिच्या धुंद गंधात गंधाळता
इथे दरवळे भेट हृदयातुनी. .
अधर स्पर्शता लाजली बावरी
"नको ना, नको ना" उगी बोलली
तिचे लाजणे जीवघेणे असे
नकारातही हाय ती हासली. . .
किती शांत एकांत द्यावा तिने
जिच्या सोबती मोहरावी क्षणे
अता फक्त आठव मला यायचे
तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे…
पूजा भडांगे

Thursday, January 28, 2016

स्पर्श


स्पर्श
हुबेहूब हे चित्र तुझे तरी
काय कमी न त्यांत कळे?
ओठ गुलाबी, गहिरे डोळे
त्यांत परी ना तूच कुठे!
हुबेहूब हे शिल्प तुझे तरी
काय कमी न त्यांत कळे?
हसरा चेहरा, सुडौल बांधा
त्यांत परी ना तूच कुठे!
घेता हात हातांत तुझा मी
कळले मज ते काय उणे
हुबेहूब हे चित्र, शिल्प तरी
स्पर्श, गंध त्यां तुझा कुठे?
निरभ्र आकाश, झरे खळाळते
चंद्र तूच अन तूच चांदणे
उमलते फुल, तान मधुर
पहाट तूच अन तूच धुके
आकाश, धुके हे चंद्र, चांदणे
फुल, तान जरी रूप तुझे
पहाट धुक्यापरी सर्व हि खोटे
कारण.........
स्पर्श, गंध त्यां तुझा कुठे?
- केदार

Wednesday, January 27, 2016

पाहीलं मी तुला

पाहीलं मी तुला

पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना
ते नाते अनामिक तु अनावर जपताना ।।

पाहीलं मी तुला
तु एकांतात असताना, माझ्यासाठी झुरताना,
तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुला माझं चित्र पाहताना
ओढ्याकिनारी फुलपाखरांशी गप्पा मारताना
माझे प्रतिबिंब समजून तूला स्वतःशीच बोलताना
पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना ।।

पाहीलं मी तुला
खळखळून हसताना, भरभरून जगताना
माझ्या दुःखाला कवटाळून तुला मुसमुसून रडताना,
तू नशिबाशी लढताना प्रत्येक वेळी जिंकताना,
प्रेमासाठी माझ्या मात्र तुला वेळोवेळी हरताना
पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना ।।

- माहीराज


Tuesday, January 26, 2016

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा
आज आभाळी सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा 

ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा !!


Monday, January 25, 2016

एक निरंतर प्रवास

एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे.

~ चंद्रशेखर गोखले

Wednesday, January 20, 2016

भास

भास

तू जवळ नसलीस म्हणून काय झालं,
आपल्या सोनेरी क्षणांना मी मनात जपतो !
भूतकाळातल्या आठवणीत रममाण होतो,
निसर्गातल्या सुंदरतेत तुझाच भास होतो !!

पक्षांची किलबिल कानाला गोडवा देते,
जणू मंजुळ आवाजात तू मला बोलावतेस !

नदीचा खळाळता प्रवाह धुंद करतो,
तुझ्या मधुर हसण्याचा आभास देतो !

पहाट गारव्याचा मंद वारा शहारतो,
तू प्रेमाने स्पर्शून गेल्याचा भास होतो !

सूर्याची कोवळी किरणे सर्वदूर पसरतात,
तुझ्या ऊबदार प्रेमाची चाहुल देतात !

पावसाची संततधार मला मंत्रमुग्ध करते,
तुझ्या मायेच्या ओलाव्याची जाणीव होते !

सागरात फेसाळणा-या लाटांवर मी आरूढ होतो,
तुझ्या अवखळ स्वभावाची तो साक्ष देतो !

तू जवळ नसलीस म्हणून काय झालं,
आपल्या सोनेरी क्षणांना मी मनात जपतो !
भूतकाळातल्या आठवणीत रममाण होतो,
निसर्गातल्या सुंदरतेत तुझाच भास होतो !!
निसर्गातल्या सुंदरतेत तुझाच भास होतो !!

विजय जोशी

तुझ्यासोबत

तुझ्यासोबत
कधीतरी पहाटे
एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी,
आणि दचकून उठताना
तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी,
यासारखं सुख ते काय?
कधीतरी भांडताना
एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी,
आणि ती छॊटीशी जखम
दिवसभर छळत रहावी,
यासारखं दु:ख ते काय?
कधीतरी रविवारी
सगळं घर पसरलेलं,
आणि दुपार नुसतं पडून
आळसात घालवावी,
यासारखी मजा ती काय?
कधीतरी रडताना
तू एखादं वाक्य टाकावं,
आणि मी रडता रडता हसले
की पटकन कवेत घ्यावं,
यासारखा आधार तो काय?
कधीतरी लढताना
सगळे माझ्या विरुद्ध,
आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर
एका नजरेतंच समर्थन मिळावं,
यासारखं बळ ते काय?
कधीतरी चुकताना
मला तू वेळोवेळी बजावावं,
आणि तू सांगूनही मी चुकल्यावर
पुन्हा एकदा समजून सांगावं,
यासारखं प्रेम ते काय?
कधीतरी हसताना
तुझ्या डोळ्यांत पहावं,
आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं
सार्थक झालं असं वाटावं,
यासारखं समाधान ते काय?
कधीतरी जगताना
जुन्या आठवणींना जागवावं,
आणि जे हवं ते सर्व तू दिलंस
असं म्हणता यावं,
यासारखं आयुष्य ते काय?
-अनामिका.

Thursday, January 14, 2016

तरी भासते मला ती जगावेगळी

तरी भासते मला ती जगावेगळी

ओझं

फुलाच्या पाकळीला
थेंबाचं ओझं
मी तुझ्याकडे पाहिलं की
तसं होतं तुझं....
~ चंद्रशेखर गोखले 

Monday, January 11, 2016

नाते

नाते
नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही

ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला
स्वर मेघ मंजुळाचा बरसे दिशांत दाही

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
मंजिल की जयाची तारांगणात नाही
-कुसुमाग्रज

Friday, January 08, 2016

कित्ती मज्जा येईल...

एक क्षितीजाजवळचं गाव बघना...
आपल्या दोघाना राहयला
कित्ती मज्जा येईल जगाकडॆ
थोडं अंतर ठेऊन पाहयला....
- चंद्रशेखर गोखले


चंद्रशेखर गोखले यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा.....

चंद्रशेखर गोखले यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा.....

Thursday, January 07, 2016

सांज सकाळी कातरकाळी

सांज सकाळी कातरकाळी
येतात नेहमी तुझ्याच आठवणी
आठवणी त्या मन करतात उदास
तेव्हा खरच हवा असतो हलवा स्पर्श तुझाच
- मनीषा

Wednesday, January 06, 2016

आठवतंय ....

आठवतंय ....
आठवतंय सगळं आठवतंय
लहानपणी माझ्या तोंडातली
ती बोबडी भाषा आणि
त्यावरून घरात पिकणारा हशा
तुम्ही बाहेर जाताना
मला नाही म्हणण
पण थोडा रडल्यावर मात्र
मला घेऊनच बाहेर पडणं
दिवाळीच्या दिवसात
माझं फटक्यांना घाबरणं
आणि मग तुमचं
इतरांवर ओरडणं
कोणी नसताना तुमचं
माझ्या बरोबर खेळणं
संध्याकाळी माझ्यासाठी
बागेत येऊन बागडणं
पण , एकदिवस तुम्ही
आमच्यातून गेलात निघून
तुम्हाला शोधता शोधता
मी मात्र गेलो पार थकून
आई म्हणाली आता तुम्ही
कधीच नाही येणार
मीही म्हणालो माझे आजोबा
मला कधीच नाही सोडणार
आजही मला प्रत्येक
क्षण स्पष्ट आठवतोय
तुमच्या त्या चादरीची
उबदार माया आजही अनुभवतोय
आता मी नीडर झालोय
फक्त एकदा पाहून जा
प्रत्यक्षात नाही जमणार
पण, स्वप्नात तरी भेटून जा !!!

Tuesday, January 05, 2016

वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

#‎पठाणकोट‬ येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शत्रूंशी लढताना
शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली ...

मी तुला छळलं

मी तुला छळलं
पण हे नकळत घडलं
वर वर शांत दिसणारं डबक
किती अस्वस्थ असतं
हे मला दगड मारल्यावर कळलं

Monday, January 04, 2016

'मैत्री तुटायला कधी सुरुवात होते.....?'

'मैत्री तुटायला कधी सुरुवात होते.....?''

आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा .
मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा .
आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा .
मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत हे समोरच्याला सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा .

मित्र असे का वागला हे त्याला न विचारता आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा .
आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा .
मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा .

भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे असे आपण ठरवतो तेव्हा .
मित्र श्रीमंत झाल्यावर आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा .
आपला मित्र आता बदलत चालला आहे अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा .

मित्र बिझी असेल, त्यालाही त्याच्या अडचणी असतील हे आपण विसरायला लागतो तेव्हा .
आपल्या मित्राची आपण चार-चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा .
आपण जसा विचार करतो तश्याच विचाराने मित्राने वागले पाहिजे असा दुराग्रह बनतो तेव्हा .

आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे हे लोकांना सांगायला हवे अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा .
खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा .

कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा .
आपले मित्रांशिवाय काही अडत नाही हे आपण नकळत मित्राला दर्शवायला लागतो तेव्हा .
आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा .

मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा .

खर तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते , तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात .
असे असेल ,तसे झाले असेल ...असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो .

मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.
पण कुठेतरी गैरसमज , अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते .

''चांगली मैत्री बनायला
अनेक काळ जावा लागतो
पण मैत्रीमधील धागे तुटायला
एका क्षणाचाही वेळ लागत नाही ''
तेव्हा मित्रांनो ,

तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा .
आणि
तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका —


आपलाच एक मित्र...!!

मनातलं मन

मनातलं मन

Sunday, January 03, 2016

सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणक्षेत्रातले योगदान फार मोठे आहे. आज समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. समाजात विविध क्षेत्रात महत्त्वाची पदे महिलांनी भूषविली आहेत. या सर्वांचा पाया सावित्रीबाई फुले यांनी घालून दिला आहे.
आज शिक्षणाच्या बळावर स्त्रिया जवळपास सर्वच क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करत आहेत, या सर्व सावित्रीबाईंच्याच लेकी आहेत.
शिक्षणाच्या माध्यमातून रुढींमध्ये अडकलेल्या भारतीय समाजाला नवी संजीवनी देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन!