Showing posts with label Aai/Baba. Show all posts
Showing posts with label Aai/Baba. Show all posts

Thursday, February 15, 2018

आई वडील

घराचा कोपरांकोपरा शोधला
कुणास ठाऊक आई-वडील
स्वतःची दुःख कुठे लपवून
ठेवतात


Friday, January 12, 2018

"बूट...."

"बूट...."
लग्नघटिका जवळ येत चाललेली.
त्याच्या मनाची घालमेल.
त्याची एकुलती एक लेक.
तिचंच लग्न आज.
मोजकी माणसं.
साधासा हाॅल.
त्याला तेवढंच परवडण्यासारखं.
फोर्जींग कंपनीतला तो एक साधासा सुपरवायझर.
सुरवात हेल्परपासून.
ईच्छा खूप होती , पण नाही शिकता आलं.
अनुभव.
अनुभवातून खूप काही शिकता येतं.
तो शिकत गेला.
कुठल्याही कामाला कधी नाही म्हणलं नाही.
आता सुपरवायझर आहे.
छोटसं का होईना, डोक्यावर स्वतःचं छप्पर आहे.
त्याची बायकोही तशीच.
त्याला साजेशी.
आहे त्यात समाधान मानणारी.
सोन्याचे नाही, पण समाधानाचेच दागिने मिरवले आयुष्यभर.
नवर्याच्या कष्टांची जाणीव जपणारी.
होईल तेवढं वरकाम तीही करायची.
हाताला चव होती.
कुठं कुठं स्वयपाकाला जायची.
सरस्वती.
त्यांची एकुलती एक.
नाव सार्थ करणारी.
खरंच नाव काढलं पोरीनं.
हुशार आणि तेवढीच मेहनती.
कुठलंही कोचींग नाही.
परवडणेबल नव्हतंच.
स्वतःच्या जीवावर शिकली.
बी.सी.एस.ची फी सुद्धा जड गेली घराला.
तो हमखास डबल शिफ्ट करायचा.
आठवड्यातून तीनदा तरी.
चार पास दिवस लेकीशी गाठभेट व्हायची नाही.
सरू घरी येताना दाराकडे बघायची.
दारात बापाचे मळकट बूट बघितले की खुष.
पटकन् त्याला चहा करून द्यायची.
तिचं काॅलेज , तिचा अभ्यास.
तो कौतुकी कानांनी तृप्त ऐकायचा.
कष्ट सार्थकी लागल्यासारखा शांत झोपायचा.
त्याच्या लेकीच्या ऊज्वल ऊद्याची स्वप्न रंगवत.
तो आडवा झाला की त्याचे बूटही निवांत.
सर्जा राजाची जोडीच ती.
दिवसभर विश्रांती नसायची त्यांना.
घरधनी राब राब राबायचा.
तो झिजत होता.
त्याच्या बूटांचे तळवेही.
झिजण्यातला आनंद ऊपभोगत होते सगळे.
कंपनीनं दिलेले सेफ्टी शूज होते ते.
त्याला जीवापाड जपायचे.
सरू बी.सी.एस. झाली.
कॅम्पसमधनं सिलेक्ट झाली.
लगेच नोकरीला लागली.
छोट्याशा आय. टी. कंपनीत.
शहाणी पोर ती.
कष्टाच्या ईस्टेटीचा आपला हिस्सा मागून घेतला.
लगेचच.
दोन वर्ष प्रचंड मेहनत.
पैसा साठवत गेली.
मग पार्ट टाईम जाॅब आणि एम. सी. ए.
नोकरी आणि अभ्यास.
तारेवरची कसरत.
सर्कशीतल्या खेळाडूंचच घर ते.
जीवाशी खेळ सहज जमायचे.
ही दोन वर्ष झटकन् संपली.
पुन्हा कॅम्पस.
आता मात्र चांगली आॅफर.
दणकून पॅकेज.
आनंदी आनंद.
दोन वर्षात, त्याच्या बुटांच्या दोन जोड्या झिजून मेल्या.
कंपनीतून दर वर्षी नवीन मिळायचे.
नाहीतर ,एकच जोडी त्यानं आयुष्यभर दामटली असती.
पुन्हा डबलशिफ्ट.
पोरीचं लग्न.
जावई दारात चालून आला.
सरूच्याच कंपनीतला.
रीतसर मागणी घातली.
लग्न ठरलं सुद्धा.
साधसंच.
तरीही हाॅल , जेवण.
कापडचोपड.
किमान शंभर माणसं तरी.
लग्नाचा निम्मा खर्च मुलाकडचे करणार होते.
तरीही त्याचा हिस्सा बराच.
सरूनं किती म्हणलं.
नाही.
पोरीच्या पैशाला हात लावला नाही त्यानं.
जमवलं.
कंपनीच्या निळ्या वर्कशाॅपसूटची सवय शरीराला.
किती तरी वर्षांनी निळा सफारी चढवलेला.
सवयच नव्हती.
बूट कशाला हवेत ?
आपले आहेत की कंपनीतले.
सेफ्टी शूज.
पाॅलीश करून ठेवलेत काल.
नव्यासारखे.
चकचकीत.
तो तयार होता.
आत्ता मुलाकडची मंडळी येतील.
कुठे गेले बूट ?
सापडतच नाहीयेत.
तो प्रचंड अस्वस्थ.
हाॅलमधल्या त्या छोट्याशा खोलीत प्रचंड ऊलथापालथ.
तो अस्वस्थ.
एवढ्यात गलका.
मंडळी आली.
नातेवाईकांच्या गोतावळ्यातला जावई त्याच्या खोलीत शिरला.
डायरेक्ट.
'सासरेबुवा , मीच लपवले आहेत तुमचे बूट.'
त्याच्या मित्राने पिशवीतलं खोकं बाहेर काढलं.
कचकचीत नवे कोरे लेदर शूज.
स्वतःच्या हाताने सासर्याच्या पायात चढवले.
मनोभावे पाया पडला.
तो हिप्नोटाॅईज झाल्यासारखा.
" आता निवांत.
डबल शिफ्ट बंद.
पळण्याचे दिवस संपले.
या बुटांनी मजेत चालायचं.
मस्त रहायचं.
निवांत.
एरवी जावयाचे बूट पळवतात.
मी म्हणलं, आपण सासर्याचे पळवू.
राबणार्या हातांईतकेच, पळणारे पाय तेवढेच महत्वाचे.
त्यांना जपायला हवंच.
तुमची लेक जपून ठेवणार आहे ते बूट."
बूटांची अशी पळवापळवी पहिल्यांदाच.
तो हिप्नोटाॅईज.
जावयाचे हात हातात घेतले.
शब्दांशिवाय बरंच काही बोलला.
एक टपोरा थेंब नव्या बुटांवर टप्पकन सांडला.
आपल्या हातानं ,त्याच्या जावयानं तो पटकन् पुसला.
जगातला सगळ्यात 'श्रीमंत' माणसाच्या मुलीचं लग्न आनंदात पार पडलं.
कुर्यात सदा मंगलम !
Boot, Marathi Lekh



Friday, July 10, 2015

पप्पा

पप्पा

असतील जगात जन्मदाते कित्येक
पप्पा माझे आहेत लाखात एक

न भेद केला कधी मुला मुलीचा
प्रत्येक भाव जाणिला माझ्या मनिचा

सवंगडी म्हणुनी मजसवे खेळले
सखिसारखे हितगुज ग केले

जीवनी खचले मी कित्येक वेळा
जवळी मज केले म्हणुनी
बाळा

जेव्हा मज संकटांनी घेरले
जावुनि त्यांच्या कुशीत निजले

दिला मग तेव्हा त्यानी उबारा
दुसरा काय पिल्लाला हवा आसरा

पिल्लू ग मी त्यांचे चिमुकले
पंखांखाली मायेच्या भय सम्पले

म्हणतात मज आता ते मार भरारी
सोडूनि कसे जावे शल्य हेच उरी

घरट्याकडे नजर जाई वेळोवेळी
पडले बाहेर घरट्यातून कधी काळी

हसत मज निरोप देता डोळे पुसतात वळुनी
मला म्हणे न रडता जा पाहु उडुनी

कोण मायेने पांघरेल मज
कोण म्हणेल ये बाळ कुशीत निज

मानते मी त्यानाच सर्वकाही
त्याजागी मजला दूजे कुणी नाही

भाव हे सारे आठवूनी
येते भरुनी पाणी नयनीं

प्रत्येक जन्मी मिळो मज हेच पप्पा
एकच प्रार्थिते तुज देवबाप्पा ! ! !

. . . . सौ. राखी हिरेमठ . . जुन १९९४

Tuesday, June 30, 2015

' या आईला काही कळतच नाही...'



' या आईला काही कळतच नाही...'

या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही
या आईला ना काही कळतच नाही


दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

कपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते
बस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून.. भरभर येते
नमस्कार करायला लावते.. कौतुक करत नाही
या आईला ना काही कळतच नाही

शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू... नेहमीच ओरडते
अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते
मी चित्रं काढलेलं... लक्ष देत नाही
या आईला ना काही कळतच नाही

होमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही
या आईला ना काही कळतच नाही

दमून जाऊन झोप येते..मग मला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला वेळ देता येत नाही
पापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला आवडत नाही
पण या आईला ना काही म्हणजे काही कळतच नाही...

Being a mother is one of the highest paid jobs in the world since the payment is PURE LOVE . You must appreciate..............

जुने फोटो

जुने फोटो

किती छान वाटते
जुने फोटो बघायला .
मलाही आवडते
स्वताला फोटोत
बंद करून घ्यायला


कधीही बघा
वय कसे तेच असते
ह्या सरत्या वयातही
आपले जुने वय
आपल्यालाच
नव्याने भेटत असते

मी बघत बसतो
बालपणीचे फोटो
ती खिडकी तशीच
नि
आभाळात ढग
अजूनही बरसत नसतो
वाटत रहाते
उघड्या दारातून

आई कधीपण येईल
अभ्यास झाला का म्हणून
नुसतेच डोळ्याने विचारीन
कधी कधी
फोटो बघताना

ती दिसून जाते
आणि तिची आठवण
शप्पत
ओली ओली होऊन येते
जुने फोटो बघताना

माझे असेच होऊन जाते
वर्तमान काळ हरवून जातो
अन
मन फुलपाखरू होऊन
झुलून जाते

प्रकाश

Sunday, May 10, 2015

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

Mother's Day, Aai
प्रसिध्द उद्योगपती बी जी शिर्के यांच्या आयुष्यातीली प्रसंग
‪#‎मातृदिन‬ ‪#‎आई‬ ‪#‎mothersday‬ ‪#‎happymothersday‬

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते. उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली. संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले. तितक्यात मुलगा शाळेतून आला आईला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन.

मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले. मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो. माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ
करून आला आई जवळ बसला आणि आईला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय.

आई ने आजूबाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते. पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर. माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला. गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या, हाताची लाही लाही झाली. पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न उशीर होतोय. त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले. त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली.

आई ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले, मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले ? मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या, मग आईने विचारले दिलेल्या १० रुपयाचे काय केलेस काही खाल्लेस कि नाही. त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिश्यातून पक्कड काढून आईच्या हातात दिली. आईच्या डोळ्यात त्या पक्कडीच्या स्पर्शाने अश्रू आले आई धन्य झाली.....

आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली ."

"दोस्तानो ,आईच्या पायाशी स्वर्ग आहे ..कधी हि तिला दु:खवू नका ....
डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई
पुन्हा दिसत नाही "

"फक्त Like किंवा Share नका करू, आपल्या आई साठी काही तरी करा .....!
आई माझा गुरु ..
आई कलपतरु . .
आई सैख्याचे सागरु..
आई माझी ..

Tuesday, March 24, 2015

बाबा रिटायर होतोय

बाबा रिटायर होतोय

बाबा रिटायर होतोय
आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.

आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,
"मी आता रिटायर होतोय,
मला आता नवीन कपडे नको,
जे असेल ते मी जेवीन,
जे असेल ते मी खाईन,
जसा ठेवाल तसा राहीन."

काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं,
आणि टचकन पाणी डोळ्यात यावं,
काळीजच तुटावं, अगदी तसं झालं.

एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं.
का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ?
मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ?
तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्याने दम दिला नाही,
"काय हवं ते करा माझी तब्बेत बरी नाही,
मला कामावर जायला जमणार नाही."

खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा,
पण तो काकुळतीला का आला?

ह्या विचारातच माझं मनं खचलं.
नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
बाबाच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याबरोबर वाढत होता तो अहंकार,
आणि त्याने वाढत होता तो विसंवाद,

आई जवळची वाटत होती,
पण बाबाशी दुरावा साठत होता.
मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं,
पण ते शब्दात सांगताच आलं नाही,
बाबानेही ते दाखवलं असेल,
पण दिसण्यात आलं नाही.

मला लहानाचा मोठा करणारा बाबा,
स्वःताच स्वतःला लहान समजत होता.
मला ओरडणारा - शिकवणारा बाबा,
का कुणास ठाऊक बोलताना धजत होता.

मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला,
शरीर साथ देत नव्हतं,
हे त्या शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला,
घरात नुसतं बसू देत नव्हतं.हे मी नेमकं ओळखलं.
खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,
सांगायचच होतं त्याला कि थकलायेस आराम कर, पण
आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा कि “मावळ आता”.

लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा,
मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा,
आणि नंतर चांगलं
वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा,
आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतो,
तेव्हा वाटतं कि काही जणू आभाळंच खाली झुकलं.

आज माझंच मला कळून चुकलं.
— I love my dad

#MarathiKavitaBlog

Friday, January 30, 2015

बाळा तुला सोडून जाताना

 कामावर जाताना सर्व गृहिणींच्या भावना
बाळा तुला सोडून जायला मन घट्ट कराव लागत.
मनात दुख साठवून चेहर्‍यावर हसू दाखवाव लागत.
बाळा तुला सोडून जायला खूप त्रास होतो मला.
तुज्या विना करमेना काय सांगू तुला
-वैशाली ललित दुधाने
#MarathiKavitaBlog

Monday, December 15, 2014

आई

 आई

आई हे ईश्वराचे
पवित्र-पावन नाव
माया,प्रेम,आपुलकी
व वात्सल्याने गजबजलेले गाव.

आई हे देवासमोर
सतत जळणारी निरांजन,
जगातील सर्वात मोल्यवान
कधीही न संपणारे धन.

आई हे प्रेम देणारा
अमृताने भरलेला झरा,
मनाच्या जखमेवर
मायेची फुंकर घालणारा वारा.

आई हे वात्सल्याने
काठोकाठ भरलेला सागर,
रसाळ मधुर वाणीने भरलेली घागर.

आई हे मृत्यूवर
मात करणारे अमृत,
सदा आशीर्वाद देणारा
देवतुल्य हस्त.

#MarathiKavitaBlog

Wednesday, September 10, 2014

अपण मोठे झाल्या नंतर....

 अपण मोठे झाल्या नंतर,
स्वता: किती ही नट्टापट्टा केला,
तरी
हिरो झाल्याची फिलिंग तर तेव्हाच यायची,
जेव्हा लहानपणी आई अंघोळ घालुन,
काजळ पावडर लावुन,
हनुवटीला पकडुन,
साइडने भांग पाडायची....

#MarathiKavitaBlog

Friday, June 27, 2014

Tuesday, May 27, 2014

ती माझी मुलगी

ती माझी मुलगी
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली..
माझ्या डोळ्यांपुढची वाट सगळी धुकं धुकं झाली
तिची मांजरी, तिची पुस्तकं, तिची वाद्यं, तिची घुंगरं
लाडके कपडे आणि पत्रं, तिचे फोटो .. तिची चित्रं
कुणी गात नाही... कुणी हसत नाही..
सगळ्यांना जातांना स्टॅच्यू म्हणून गेली..
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली....
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली
इवली असल्यापासून इथे तिचंच राज्य होतं
जरा कुठे गेली की घर कावरं बावरं होत होतं
तिचं बोलणं, तिचं हसणं, रागाने कधी तणतण करणं
तिचं गाणं तिचं हसणं, मनापासून चित्र काढणं
तिच्यामुळे आमच्या घरची मैफल रंगत गेली..
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली....
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली
आमच्या गप्पा, आमची गुपितं, आमचा स्वयंपाक, बाहेर जाणं
आमच्या टिंगली, आमची भांडणं, चिडवाचिडवी, खरेद्या करणं
स्वप्नं, चिंता, वैताग सांगणं, एकमेकींना घडवत राहणं
पोकळी होणं म्हणजे काय याची समज आली..
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली....
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली
बावीस वर्ष मुलगी आपल्याला किती काय काय देते
वाढत्या वयात किती गोष्टी प्रेमाने शिकवत राहते
माया देते, धीर देते, आपल्यासाठी तीच कळवळते
ओह्हं कसलं ? फुलपाखरू ते याची जाण झाली..
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली....
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली
तिच्या माझ्या धाग्यांचं एक नातं विणलं आहे
तिचे वेगळे, माझे वेगळे रंग घेणार आहे
नवं नातं विणण्यात आता ती गुंतली आहे
त्याचे रंग सुंदर वेगळे, मला कळतं आहे
एकमेकींना दुर्मिळ झालो याची जाणीव झाली..
ती माझी मुलगी ...लग्न होऊन गेली....
घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली
कवयित्री : शोभा भागवत