Tuesday, October 24, 2017

फ्रिज - मराठी लेख



फ्रिज असे म्हणतात की एखाद्या देशाची परीक्षा तिथल्या सार्वजनिक शौचालयावरून होते. त्या धर्तीवर मी म्हणेन की एखाद्या घराची परीक्षा त्या घराच्या फ्रिजवरून होते...माझी आजी फ्रिजला आळशी कपाट म्हणायची. तिला वाटायचे की ज्या वस्तू नीट ठेवायच्या नसतील त्या कोंबण्यासाठी असतो हा फ्रिज.
त्याच्या पुढे जाऊन मला असे वाटते की फ्रिज हा घरच्या घडामोडींचा आणि वातावरणाचा द्योतक असतो.
माझ्या निरीक्षणात आलेले विविध प्रकारचे फ्रिज:
आळशी फ्रिज:
या फ्रिजमध्ये काय सापडेल याचा नेम नसतो. या फ्रिजमधले पदार्थ तिहार जेलच्या कैद्यांसारखे बाहेर पडायची वाट बघत असतात...आणि एकमेकाना तू इथे कधीपासून आहेस हा प्रश्न विचारतात आढळतात.फाशीची शिक्षा मिळूनही प्रत्यक्षात ती मिळेपर्यंत वाट बघणाऱ्या कैद्यांप्रमाणे बसलेल्या एक्सपायरी डेट गेलेल्या बाटल्यांपासून कधीही घरचे लोक भेटायला न येणाऱ्या कैद्यांसारख्या दुर्लक्षित काही दिवसापूर्वीच्या उरलेल्या शिळ्या अन्नापर्यंत सर्व प्रकार असतात इथे ! काही जन्मठेप मिळालेल्या भाज्या निर्विकारपणे "सडत" पडलेल्या असतात.
हा फ्रिज जेलरच्या थंड डोक्याने या सर्व गोष्टींना सामावून घेत असतो!
टापटीप फ्रिज
या फ्रिजमध्ये सर्व वस्तुंना ध्रुवबाळासारखे स्वतःचे स्थान असते.प्रत्येक डब्याला स्वतःचे झाकण असते. भाज्यांच्या ट्रे मधल्या भाज्या फ्लॅट संस्कृती प्रमाणे बंद डब्यात बसलेल्या असतात. त्यांना शेजारच्या भाजीचा "गंध" देखील नसतो.
बॅचलर फ्रिज
हा फ्रिज सहसा रिकामाच असतो.भाड्याच्या घरात घरमालकांनी ठेवलेल्या या फ्रिजमध्ये हॉटेल रूमच्या फ्रिजसारख्या फक्त बाटल्या मात्र असतात. कधी काळी येऊन गेलेल्या आईने जाताना पुसून गेल्यावर त्या फ्रिजची कोणी विचारपूस अथवा घास पूस केलेली नसते.. जाताना आईने करून ठेवलेली लोणची मुरंबे सांभाळत आईची आठवण काढत हा फ्रिज बसलेला असतो.कधी काळी अचानक आलेल्या गर्लफ्रेंडला किचनमधील पसारा दिसू नये म्हणून वस्तू कोंबण्यासाठीही याचा उपयोग होतो.
नवविवाहित फ्रिज
हा फ्रिज उत्साहाने आणि तरुणाईने सळसळत असतो. घरच्या जुन्या वस्तूंच्या बरोबरीने सुपर मार्केटमध्ये मिळणारी एक्झॉटिक फळं आणि फ्रोझन पदार्थांची रेलचेल असते या फ्रिजमध्ये. सगळे नवे पदार्थ या फ्रिज मध्ये स्वतः चे स्थान शोधत असतात.काचेच्या नव्या कोऱ्या बाटल्यांमध्ये शेजारी शेजारी चिकटून बसलेली ऑलिव्ह ऑइलमध्ये केलेली लोणची पाहून जुनी मुरलेली लोणची नाक मुरडत असतात.
NRI फ्रिज
इतर कुठल्याही फ्रिजपेक्षा गच्च भरलेला हा फ्रिज कायम आपण कंफुज्ड असतो. माहेरून आणलेली पिठं मसाले पापड लोणची एकीकडे सांभाळताना दुसरीकडे मुलांच्या आवडीचे चीज पिझ्झा जेली प्रकारही तो लीलया सांभाळत असतो...मात्र जास्त जागा कुठल्या पदार्थांना द्यायची या संभ्रमात असतो.अगदी त्या घरच्या गृहिणीसारखा...तोच संभ्रम.. मुलांची आवड सांभाळताना आपली आवड मात्र फ्रीझरमध्ये गोठवणारा!
ज्येष्ठ नागरिक फ्रिज
या सर्वात केविलवाणा असणारा...एकेकाळी मुले मोठी होत असताना भरलेल्या या फ्रिजला आता पुन्हा दोघेच राहत असताना आलेलं रिकामपण खायला उठत असते. एकेकाळी चॉकलेटनी भरलेल्या कप्प्यांची जागा आता इन्सुलिन इंजेक्शनच्या पेनांनी घेतलेली असते. आईस्क्रीम ऐवजी फ्रीझर मध्ये मुलांनी भारत भेटीत दिलेला सुकामेवा असतो..सणावारांना मुलांच्या आठवणीसारखीच हमखास बाहेर येतो तो. भाजीचा ट्रे रिकामा असतो करण विरंगुळा म्हणून रोजची भाजी रोज संपवली जाते. उमेदीच्या काळातली वेळेची तारांबळ आता नसल्याने त्या ट्रे ला काही कामच नसते.
कसाही असो मात्र फ्रिजला प्रत्येक घरात मानाचे स्थान असते. जुना असो व नवा हा जर बंद पडला तर साऱ्या घराचे चैतन्य थंड पडते!

Fridge - Marathi Lekh


Friday, October 13, 2017

झोप येत नसेल तर... -चंद्रशेखर गोखले


झोप येत नसेल तर...
उरलेली रात्र माझ्याकडे पाठव
प्रत्येक गोष्ट कशी आपण वाटून घेतो
हे जरा स्वता:शी आठव.
-चंद्रशेखर गोखले


झोप येत नसेल तर, चंद्रशेखर गोखले

Tuesday, October 10, 2017

एक आशा... तु पुन्हा भेटण्याची.

एक आशा... तु पुन्हा भेटण्याची.

तु कवीता आहेस माझी
शब्दात, अर्थात
अन ओळींमध्ये तुलाच बघतो मी
पण तु येतेस
आणि लगेच निघुन जातेस
अगदी एखाद्या चारोळी सारखी

अन मग मी बसतो.
तुझ्या आठवणी रंगवत.
तुझ्या थोड्याश्या अस्तित्वाने ही
भारवुन गेलेल्या पाना फ़ुलांवर कवीता करत ..

आणि वाट पहात राहतो की, पुन्हा कधीतरी
भाव डोळ्यातील उलगडतील
स्पर्शातून, गाण्यातून वा एखाद्या कवितेतून ।
ते तुझ्या अस्तित्वाचे पुरावे आहेत;

आणि मांडतोय हा प्रपंच निदान ह्या आशेवरून ।

-- मंदार (साद मनाची)
Ek Aasha Tu Punha Bhetnyachi


Saturday, October 07, 2017

अप्रूप -


परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो ... फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं...... वर लिहिलं होतं .. “हरवले सापडले विभाग” ..... तीच पूर्वीची जागा .. कपाटही तेच असावं बहुधा .... पण आज ते खूपच खिन्न वाटत होतं .... सुरवातीला वाटलं की कपाटाच्या वयोमानामुळे असेल ... पण नंतर नजर त्या कपाटातल्या वस्तूंवर गेली आणि मग त्याची उद्विग्नता नेमकी कशामुळे होती याचा अंदाज आला ... आत इतक्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू , Tupper ware च्या बाटल्या , रुमाल , चित्रकलेच्या वस्तू , पेनं , key chains, कंपास , पेन्सीलचा तर खचंच पडला होता ....... शाळेतल्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या, आज काल मुलं आपली वस्तू हरवली की विचारतच नाहीत . कित्येकदा आम्ही वर्गावर्गात जाऊन विचारतो तरी आमचं नाही असं म्हणतात . कदाचित घरी गेल्यावर ती वस्तू काही मिनिटात त्यांच्या हातात येऊन पडत असेल . याला कारणं अनेक असतील. उंचावलेला आर्थिक स्तर , जे आपल्याला मिळालं नाही तर ते आपल्या मुलांना मिळावं ही वारसा हक्कानी मिळालेली विचारसरणी, कुटुंब छोटी झाल्याने एकाच्याच वाट्याला येणारे सगळे लाड आणि अशी अनेक कारणं .... ही कारणं त्या त्या ठिकाणी योग्य असतीलही.......पण .... पूर्वी आमचा साधा Eraser जरी शाळेत विसरला ज्याला त्या काळी आम्ही “खोड रबर “ म्हणायचो , तरी दुसऱ्या दिवशी तो याच हरवले सापडले विभागाच्या कपाटात ‘याची देही याची डोळा’ बघत नाही तो पर्यंत होणारी घालमेल , मग ती वस्तू आपलीच कशी आहे , त्यावर पेनानी काढलेला star मीच काढला होता हे पटवून देण्यासाठीची धडपड .... त्यासाठी वेळप्रसंगी मधल्या सुट्टीत वर्गातून आयात करावे लागणारे साक्षीदार .... आणि शेवटी ती हरवलेली वस्तू पुन्हा आपल्या हातात पडली की मिळणारे समाधान .... अशा अनेक गोष्टींमधली गंमत ही आजकालच्या मुलांना माहितीच नाहीये . आम्ही एका वेळेस १-२ पेन्सिल्स घ्यायचो , आता अख्खा box घेतो ... आधीच्या वर्षीच्या वह्यांमधली उरलेली पानं फाडून त्याचं binding करुन ती रफ वही म्हणून आनंदानी वापरायचो आता वेगवेगळ्या design च्या वह्या घेतो ...... जुन्या जाड कॅलेंडर ची पानं कव्हर म्हणून घालायचो आता Plastic Coated वगैरे वगैरे ... एकंदरीत लक्षात आलं कि आजकालच्या मुलांना कसलं अप्रूपच राहिलं नाहीये . अप्रूप ...........खरंच... सगळ्याच्या व्याख्याच बदलल्यात आता ...... पण या घटनेनी मला मात्र Flashback मध्ये नेलं... खडूंचा पूर्ण भरलेला box बघण्याचं अप्रूप ..... तो रंगीत खडूंचा असेल तर जरा जास्तंच अप्रूप...... बाईंनी खडू आणायला पाठवलेल्या मुलाने हळूंच खिशातून स्वतःसाठी आणलेला एक खडू सगळ्या वर्गाला World Cup जिंकल्याच्या थाटात दाखवण्याचं अप्रूप..... धडपडल्यावर गुलाबी-लाल रंगाचं औषध लावून घेण्याचं अप्रूप..... Lab मधल्या काकांना मस्का मारून Litmus Paper ढापण्याचं अप्रूप.... हस्तकलेच्या वेळेस हाताला चिकटून वाळलेल्या फेविकॉलचे पापुद्रे काढण्याचं अप्रूप...... स्पोर्ट्स च्या वेळेस एखाद्याला काही कारणास्तव ग्लुकॉन डी दिलं कि त्याचं अप्रूप.... gathering च्या practice साठी एकाचा टेप रेकॉर्डर घेऊन दुसऱ्याच्या घरी जाण्याचं अप्रूप....आणि बरंच काही... आजच्या जमान्यात “फालतू” वाटणाऱ्या अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आम्ही जगलो होतो आणि खूप enjoy केल्या होत्या . त्या हरवले सापडले कपाटातल्या हरवलेल्या वस्तू त्या त्या मुलांना सापडल्या नसल्या तरी मला मात्र त्या कपाटामुळे माझ्या “हरवलेल्या अनेक जुन्या आठवणी सापडल्या” ... तेवढ्यात लक्ष घड्याळ्याकडे गेलं ... मी भूतकाळातून वर्तमानात आलो आणि लगेच तिकडून निघालो ... बाहेर एक मित्र भेटला .... घाईत होता ... त्याचा मुलगा काल शाळेत colour box हरवून आला होता .. त्यामुळे नवीन घ्यायला चालला होता ..... © क्षितिज दाते, ठाणे


अप्रूप, Marathi Lekh

मनातलं सांगायचं पुन्हा एकदा राहून गेला तर - मिलिंद जोशी

मनातलं सांगायचं पुन्हा एकदा राहून गेला तर - मिलिंद जोशी 
Manatala Sangaycha Rahun Gelatar- Milind Joshi