Monday, October 17, 2016

Bhandan... भांडण...


भांडण

चंद्राचे नि माझे एकदा लागले भांडण..
भलताच भावनिक मुद्दा आणि भलतंच अवघड प्रकरण..

बाह्या सरसावून भांडू लागलो आम्ही एकेकाळचे दोस्तं..
भांडणाचं कारण एवढंच कि "त्याचं प्रेम श्रेष्ठ कि माझं प्रेम श्रेष्ठं...."

चंद्र म्हणे, "बघ मी आणि रात्र कसे भेटतो..?
आमच्या नुसत्या चाहुलीने सारा आसमंत कसा पेटतो..?

अश्या उसळतात लाटा आणि बेभान होतो समुद्र...."
बोलता बोलताच अजून उत्कटतेनं सांडू लागला चंद्र..

ऐक म्हणे, "आम्ही भेटताच होतं तारांगण लुप्त..
उरतो फक्त शुक्र, जो आधीपासूनच विरक्त आणि अलिप्त..

सारी सृष्टी गाऊ लागते मग आमचंच गुणगान..
मग मीही भरभरून देऊ लागतो त्यांच्या झोळीत चांदणदान..

सांग... हे असलं काहीतरी आहे का रे तुझं...?
सदानकदा तुझ्या डोळ्यांवर स्वप्नांचंच रे ओझं..

मग ती भेटो वा ना भेटो .. ओझी काही उतरली नाही..
आणि तुझी गाडीही पुढे काही सरकली नाही..

आठवतंय..? त्या रात्री खूप पाउस पडला होता बघ..!
तुला नव्हती सोसवत माझ्या चांदण्याची धग..

विनवत होतास मला, "जरा चांदणं आवरून घे..
आणि आता मला खरंखुरं उन दे..."

इथं मग होऊ लागली माझी गोची मात्र..
इतक्यात सोडून चालली त्याला त्याची रात्र..

कावरा बावरा होऊन त्याचे थरथरु लागले पाय..
म्हणालो मीही मिश्किलपणे "ओ चंद्रराव ... काय चाललंय काय..?"

रात्रीचे जसे जसे बदलू लागले रंग..
जरा फिके होऊ लागले चंद्राचेही अंग..

सूर्यबिंब जागं होऊन लागलं आभाळावर पसरू...
तो तो इकडे चंद्राच्या डोळ्यात जमू लागले अश्रू..

मग मीच म्हणालो त्याला जवळ घेऊन थोपटत त्याची पाठ..
"तुझी आणि माझी थोडीशीच वेगळी आहे वाट..

दोघांच्याही नशिबात पूर्ण सुख नाही.
आणि त्यात दोघांचीही काहीच चूक नाही.

आमच्यात जन्माचा दुरावा, व्यर्थ गेले सारे नवस
तुझ्या आणि रात्रीच्या आड आहे फक्त दिवस...

आता माझ्या डोळ्यातूनच अधूनमधून ती गळते रे.
दिवस सरला कि पुन्हा तुला रात्र मिळते रे..

युगानुयुगे चालूये हे, विनासायास.. विनाकष्ट..
घेतोय माघार मी, मान्यंय तुझंच प्रेम श्रेष्ठ.."

दिसू लागली त्याच्या डोळ्यात जरा पश्चात्तापाची झाक..
पाठ फिरवून मी चालू लागताच त्यानं दिली मला हाक..

"जाऊ नकोस रे माझ्यावर, नाराज होऊन असा..
माझ्या अंगा-अंगावर तुझ्याच कवितेचा रे ठसा..

झालो होतो मी कृतघ्न, झालो होतो पापी..
खरच माफ कर, मनापासून मागतो मी माफी..

तू होतास म्हणून तर मला मिळालं महत्व..
तूच तर जाणलंस माझ्यातलं काव्यतत्व..

नहितर होऊन राहिलो असतो मी दगड अंतराळातला..
कुणी केली असती माझी फुलांसोबत तुला..??

मी तुझी खपली अशी काढायला नको होती..
माझ्याकडून अशी आगळीक घडायला नको होती..

ती गेल्यावर, हक्कानं ठेवली होतीस तू मान माझ्या खांद्यावर..
श्रावणालाही लाजवणारी बरसली होती तेंव्हा सर..

किती काळ लोटलाय पण सर तश्शीच बरसतिये संततधार..
मलाच लाज वाटतीये आता, राजा मीच मानतोय माझी हार..

ती नाहीये तुझ्यासोबत पण तू नाहीयेस विसरत तिला...
मीच जातो कि रे सोडून पंधरा दिवस माझ्या रात्रीला.."

बोलता बोलताच कंठ दाटून चंद्र रडू लागला ढसाढसा..
पुन्हा एकदा त्याच्यावर उमटला माझ्या कवितेचा ठसा..

तेंव्हाच आम्ही दोघांनी घेतली शप्पथ, केला पण..
विसरून जायचं, दोघांमध्ये झालं होतं 'भांडण'..

आता हल्ली चंद्र जरा जास्तच समजून उमजून वागतो..
आणि मीही हल्ली लवकरच झोपतो.......... क्वचितच जागतो..

-चेतन दीक्षित

No comments:

Post a Comment