Friday, January 12, 2018

"बूट...."



"बूट...."
लग्नघटिका जवळ येत चाललेली.
त्याच्या मनाची घालमेल.
त्याची एकुलती एक लेक.
तिचंच लग्न आज.
मोजकी माणसं.
साधासा हाॅल.
त्याला तेवढंच परवडण्यासारखं.
फोर्जींग कंपनीतला तो एक साधासा सुपरवायझर.
सुरवात हेल्परपासून.
ईच्छा खूप होती , पण नाही शिकता आलं.
अनुभव.
अनुभवातून खूप काही शिकता येतं.
तो शिकत गेला.
कुठल्याही कामाला कधी नाही म्हणलं नाही.
आता सुपरवायझर आहे.
छोटसं का होईना, डोक्यावर स्वतःचं छप्पर आहे.
त्याची बायकोही तशीच.
त्याला साजेशी.
आहे त्यात समाधान मानणारी.
सोन्याचे नाही, पण समाधानाचेच दागिने मिरवले आयुष्यभर.
नवर्याच्या कष्टांची जाणीव जपणारी.
होईल तेवढं वरकाम तीही करायची.
हाताला चव होती.
कुठं कुठं स्वयपाकाला जायची.
सरस्वती.
त्यांची एकुलती एक.
नाव सार्थ करणारी.
खरंच नाव काढलं पोरीनं.
हुशार आणि तेवढीच मेहनती.
कुठलंही कोचींग नाही.
परवडणेबल नव्हतंच.
स्वतःच्या जीवावर शिकली.
बी.सी.एस.ची फी सुद्धा जड गेली घराला.
तो हमखास डबल शिफ्ट करायचा.
आठवड्यातून तीनदा तरी.
चार पास दिवस लेकीशी गाठभेट व्हायची नाही.
सरू घरी येताना दाराकडे बघायची.
दारात बापाचे मळकट बूट बघितले की खुष.
पटकन् त्याला चहा करून द्यायची.
तिचं काॅलेज , तिचा अभ्यास.
तो कौतुकी कानांनी तृप्त ऐकायचा.
कष्ट सार्थकी लागल्यासारखा शांत झोपायचा.
त्याच्या लेकीच्या ऊज्वल ऊद्याची स्वप्न रंगवत.
तो आडवा झाला की त्याचे बूटही निवांत.
सर्जा राजाची जोडीच ती.
दिवसभर विश्रांती नसायची त्यांना.
घरधनी राब राब राबायचा.
तो झिजत होता.
त्याच्या बूटांचे तळवेही.
झिजण्यातला आनंद ऊपभोगत होते सगळे.
कंपनीनं दिलेले सेफ्टी शूज होते ते.
त्याला जीवापाड जपायचे.
सरू बी.सी.एस. झाली.
कॅम्पसमधनं सिलेक्ट झाली.
लगेच नोकरीला लागली.
छोट्याशा आय. टी. कंपनीत.
शहाणी पोर ती.
कष्टाच्या ईस्टेटीचा आपला हिस्सा मागून घेतला.
लगेचच.
दोन वर्ष प्रचंड मेहनत.
पैसा साठवत गेली.
मग पार्ट टाईम जाॅब आणि एम. सी. ए.
नोकरी आणि अभ्यास.
तारेवरची कसरत.
सर्कशीतल्या खेळाडूंचच घर ते.
जीवाशी खेळ सहज जमायचे.
ही दोन वर्ष झटकन् संपली.
पुन्हा कॅम्पस.
आता मात्र चांगली आॅफर.
दणकून पॅकेज.
आनंदी आनंद.
दोन वर्षात, त्याच्या बुटांच्या दोन जोड्या झिजून मेल्या.
कंपनीतून दर वर्षी नवीन मिळायचे.
नाहीतर ,एकच जोडी त्यानं आयुष्यभर दामटली असती.
पुन्हा डबलशिफ्ट.
पोरीचं लग्न.
जावई दारात चालून आला.
सरूच्याच कंपनीतला.
रीतसर मागणी घातली.
लग्न ठरलं सुद्धा.
साधसंच.
तरीही हाॅल , जेवण.
कापडचोपड.
किमान शंभर माणसं तरी.
लग्नाचा निम्मा खर्च मुलाकडचे करणार होते.
तरीही त्याचा हिस्सा बराच.
सरूनं किती म्हणलं.
नाही.
पोरीच्या पैशाला हात लावला नाही त्यानं.
जमवलं.
कंपनीच्या निळ्या वर्कशाॅपसूटची सवय शरीराला.
किती तरी वर्षांनी निळा सफारी चढवलेला.
सवयच नव्हती.
बूट कशाला हवेत ?
आपले आहेत की कंपनीतले.
सेफ्टी शूज.
पाॅलीश करून ठेवलेत काल.
नव्यासारखे.
चकचकीत.
तो तयार होता.
आत्ता मुलाकडची मंडळी येतील.
कुठे गेले बूट ?
सापडतच नाहीयेत.
तो प्रचंड अस्वस्थ.
हाॅलमधल्या त्या छोट्याशा खोलीत प्रचंड ऊलथापालथ.
तो अस्वस्थ.
एवढ्यात गलका.
मंडळी आली.
नातेवाईकांच्या गोतावळ्यातला जावई त्याच्या खोलीत शिरला.
डायरेक्ट.
'सासरेबुवा , मीच लपवले आहेत तुमचे बूट.'
त्याच्या मित्राने पिशवीतलं खोकं बाहेर काढलं.
कचकचीत नवे कोरे लेदर शूज.
स्वतःच्या हाताने सासर्याच्या पायात चढवले.
मनोभावे पाया पडला.
तो हिप्नोटाॅईज झाल्यासारखा.
" आता निवांत.
डबल शिफ्ट बंद.
पळण्याचे दिवस संपले.
या बुटांनी मजेत चालायचं.
मस्त रहायचं.
निवांत.
एरवी जावयाचे बूट पळवतात.
मी म्हणलं, आपण सासर्याचे पळवू.
राबणार्या हातांईतकेच, पळणारे पाय तेवढेच महत्वाचे.
त्यांना जपायला हवंच.
तुमची लेक जपून ठेवणार आहे ते बूट."
बूटांची अशी पळवापळवी पहिल्यांदाच.
तो हिप्नोटाॅईज.
जावयाचे हात हातात घेतले.
शब्दांशिवाय बरंच काही बोलला.
एक टपोरा थेंब नव्या बुटांवर टप्पकन सांडला.
आपल्या हातानं ,त्याच्या जावयानं तो पटकन् पुसला.
जगातला सगळ्यात 'श्रीमंत' माणसाच्या मुलीचं लग्न आनंदात पार पडलं.
कुर्यात सदा मंगलम !

No comments:

Post a Comment