Sunday, June 19, 2016

तो बाप असतो.....

तो बाप असतो.....

पोरांना नवीन कपडे आणल्यावर
शर्टच्या फाटलेल्या कॉलरमध्ये लपलेला तो बाप असतो,
फाटक्या H.M.T च्या घड्याळाच्या
पट्ट्यात मनगटावर अर्धवट तुटलेला तो बाप असतो.....

लेकराच्या सोयरिकीसाठी दारोदारी उंबरे झीजवून
क्षीणलेला,रोज थकणारा तो बाप असतो,
पोरीच्या लग्नासाठी मंडप,आहेर,आणि
वाजंत्रीचे हप्ते देतादेता स्वतःला पुरत विकणारा तो बाप असतो....

छकुलीच्या पाठवणीला आभाळ डोळ्यात साठवून
नंतर एकांतात ढसाढसा रडणारा तो बाप असतो,
लाईट गेली म्हणून घरी मेणबत्त्या नेताना
अंधारात एकट्याने धडपडणारा तो बाप असतो.......

मन मारून इच्छा सोडून पोरा बाळांमध्ये
स्वतःला बघणारा तो बाप असतो,
अधाशी पोटाच्या खळगीने हसत “जेवलो म्हणत”
रोज उपाशी जगणारा तो बाप असतो......

रोज सूर्यासारखा उगवणारा आणि सगळ्यांना झोपवून
चंद्रासारखा मावळणारा तो बाप असतो,
दुखामध्ये,अडचणीमध्ये आधार बनून
सगळ्यांना सावरणारा तो बाप असतो......
सगळ्यांना सावरणारा तो बाप असतो......!!!!

-अक्षय भिंगारदिवे,
१९ जून २०१६,

No comments:

Post a Comment