Monday, November 30, 2015

रंग पाण्याचे

मराठी भाषेची सुंदरता👌

रंग पाण्याचे

'पाणी'शब्द हा असे प्रवाही
वळवू तिकडे वळतो हा
जशी भावना मनात असते
रूप बदलते कसे पहा

नयनामध्ये येते'पाणी'
अश्रू तयाला म्हणती
कधी सुखाचे,दुःखाचे कधी
अशी तयांची महती

चटकदार तो पदार्थ दिसता
तोंडाला या'पाणी'सुटते
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी
म्हणती अविरत 'पाणी'भरते
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी 'पाणी'जाते

वळणाचे 'पाणी' वळणावरती
म्हण मराठी एक असे
बारा गांवचे 'पाणी' प्याला
चतुराई यातूनी दिसे

लाथ मारूनी'पाणी'काढणे
लक्षण हे तर कर्तृत्वाचे
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो
'पाण्या'त पाहणे गुण खोटा
'पाणी'दार ते नेत्र सांगती
विद्वत्तेचा गुण मोठा

शिवरायांनी कितीक वेळा
शत्रूला त्या 'पाणी'पाजले
नामोहरम करून अपुले
मराठमोळे 'पाणी'दाविले

टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी'पानावरती
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे
अळवावरचे अलगद 'पाणी'

कळी कोवळी कुणी कुस्करी
काळजाचे'पाणी'होते
ओंजळीतूनी 'पाणी'सुटता
कन्यादान...पुण्य लाभते

मायबाप हे आम्हां घडविती
रक्ताचे ते 'पाणी'करूनी
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडते 'पाणी'
तुडुंब,दुथडी नद्या वाहती
दुष्काळाचे सावट पडतां
सारे'पाणी..पाणी'करती

अंतीम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची
पितरांना मग 'पाणी' देऊन
स्मृती जागते आप्तांची

मनामनांतील भावनांचे
'पाण्या'मध्ये मिसळा रंग
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा
चेहर्या‍वरती उठे तरंग

No comments:

Post a Comment