Monday, November 23, 2015

।। गोष्ट छोटी, डोंगराएवढी ।।

।। गोष्ट छोटी, डोंगराएवढी ।।

त्या राजाला विश्वास असतो आपल्या प्रजेच्या प्रामाणिकपणावर. एकदा एक साधू राजाकडे येतो. राजा साधूला प्रजेच्या प्रामाणिकपणाविषयी सांगतो. ‘तेवढाच गुण आता दुर्मिळ होत चाललाय. तुझ्या प्रजेचं अभिनंदन ! पण मी तुझ्या प्रजेची एक छोटी परीक्षा घेऊ इच्छितो’, साधू बोलला. नगरात दवंडी पिटली. ‘राजवाड्याशेजारच्या हौदात प्रत्येक नागरिकाने एक लोटा दूध रात्री आणून टाकायचं.’ प्रत्येकजण हातात लोटा घेऊन हौदात दूध टाकून येत होता. हौदाकडे जाणारा कुणी एक असा विचार करत होता की, ‘इतक्या लोकांच्या दुधात आपले एक लोटा पाणी कोणाच्याच काय, देवाच्यासुद्धा लक्षात येणार नाही.’

सकाळी हौद उघडला. राजा हैराण झाला. हौदात फक्त पाणी होते. साधू महाराज अर्थपूर्ण हसले. नंतर राजा साधूसह राजवाड्यात निघाला. रस्त्यावर त्यांना एक गोड मुलगा हातात लोटा घेऊन हौदाकडे घाईघाईने जाताना दिसला. राजाने विचारल्यावर त्या मुलाने सांगितले, ‘झोपल्यामुळे रात्री हौदात माझे दूध टाकायचे राहून गेले. ते टाकायला जातोय.’ राजाने पाहिलं, तर खरंच त्या मुलाच्या लोट्यात दूध होतं.
‘मोठ्या लोकांना प्रामाणिकपणा ‘दाखवता’ येतो. काहींमध्ये तो असला तरी सर्वांत असेलच असं नाही. राजा, रात्री प्रत्येक माणूस लोटा झाकून नेत होता. रात्री तर अंधार होता ना? प्रामाणिक असणं या निरागस बाळासारखं उघड असतं. अशी मुलं आहेत, तोपर्यंत हे जग छान असेल. अशा मुलांना जप. त्यांच्यासाठी काही कर’, असं सांगून साधू निघून गेला.
गोष्टीतली ही मुलं खरी असतात का? परवा मी वरच्या गोष्टीतला मुलगा पाहिला. राज दत्तात्रय देसले असं त्याचं नाव. दुसरी-तिसरीत असावा. मी मनाने त्याला नमस्कार केला. तो कुणाला दिसणार नव्हता. निरपेक्ष कर्मयोगाची एक नाजूक कळी मला त्या मुलात दिसली. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, म्हणतात ना, अगदी असंच काहीतरी मी त्या बाळात पाहिलं. शाळा सुटली.

मुलं गलका करत घराच्या ओढीने शाळेच्या आवाराबाहेर पडत होती. त्यात हा राजही होता. पाठीला दप्तर, हातात पाण्याची बाटली. आमच्या शाळेच्या व्हरांड्यावरून मी ती मुलं पाहत होतो. राजने लक्ष वेधलं. त्याच्या हातातल्या बाटलीत बरंच पाणी उरलं होतं. वाकून तो ते पाणी सांडत होता. माझ्या शाळेतील पर्यावरणाचे शिक्षक मनोहर देसाई, मधू भांडारकर आम्ही जिज्ञासा म्हणून राजने जिथं वाकून पाणी टाकलं, तिथं पाहिलं, तर तिथे एक छोटं रोप लावलं होतं. त्या रोपाला राजने पाणी घातलं होतं. पाण्याचा सदुपयोग करणाऱ्या राजचं मला कौतुक वाटलं.

गोष्टीतल्या ‘त्या’ मुलाच्या आणि सत्यातल्या या ‘राज’सारख्या मुलांच्या माणूसपणाच्या रोपाला इथली कुटुंबव्यवस्था, शिक्षणव्यवस्था आणि समाजव्यवस्था आस्थेचं, प्रेमाचं आणि प्रेरणेचं पुरेसं पाणी घालू शकली तर या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरजच काय?

...कमलाकर देसले (मटा. ०५ मार्च २०१३)

No comments:

Post a Comment