मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वाचलेला मराठी भाषेवरचा सर्वात सुंदर मेसेज.
माझा लय जीव हाय ह्या बाईवर. मस्त, मोकाट, उंडारल्या खोंडासारखी भाषा!
लावल तितके अर्थ कमी! पंढरपूरच्या घाटापासून ते पुण्यातल्या पेठेपर्यंत
किती कळा तिच्या अंगात!
नाकातून
आवाज आला की लगेच कळतं की कोकणातून लेले किंवा नेने आलेत. "रांडेच्या"
म्हणले की लगेच कोल्हापुरी पांढरा रस्सा आठवतो. " का बे छिनालच्या" म्हणलं
की सोलापूरची शेंगा चटणी आणि "पोट्ट्या" म्हणल की नागपुरी सावजी जेवण.
पोरीच्या तोंडून "मी तिथे गेलो" ऐकू आल की सांगली आणि "भेंचोद" म्हणलं की
मुंबई!! "काय करून राहिला?" म्हणलं की नाशिक, "का करूलालाव?" म्हणलं की
लातूर आणि "विषय संपला" म्हणलं की पुणे!! हेल काढून बोललेला नगरी किंवा
बीडचा आणि "ळ" चा "ल" केला की कोकणी! एका वाक्यात माणसाचं गाव कळतं.
हिंदी बोलताना तर मराठी माणूस लगेच कळतो. आमच्या इतकी हिंदीची चिंधी कुणीच
केली नसेल. मराठी माणसाचे हिंदी आणि मुसलमान बागवान लोकांची मराठी म्हणजे
विष विषाला मारते त्यातला प्रकार. "हमारी अडवणूक हो रही है" हे मराठी हिंदी
आणि "वो पाटी जरा सरपे ठिवो" ही बागवानी मराठी ऐकून मी लय खुश होतो राव!
मराठी खासदार आणि राजकारणी लोकांचं हिंदी ऐकून तर हिंदी पत्रकारांना घाम
फुटत असावा.
एकाच गोष्टीला प्रतिशब्द तर किती? बायको, पत्नी,
सौभाग्यवती, अर्धांगिनी, सौ, खटल, कुटुंब, बारदान, बाई, गृहमंत्री, मंडळी
इत्यादी सगळ्याचा अर्थ एकचं! "इ" सारख्या आडवळणी शब्दापासून पण सुरु होणारे
कितीतरी वेगवेगळे अर्थाचे शब्द.. जसे की "इस्कोट", "इरड करणे", "इरल",
"इकनं". "ग्न" ने शेवट होणारे चार शब्द मराठीत आहेत ... लग्न, मग्न, नग्न
आणि भग्न. किती मस्त क्रम आहे ना? हे "ग्न" बाबत आमच्या मास्तरच ज्ञान!
इदुळा, येरवा, आंवदा, कडूस पडाय, झुंजूमुंजू, दोपार, सांच्याला, रातीला,
तांबडं फुटायला यातून जो वेळ कळतो त्याची मजा am, pm ला कधीच येणार नाही.
कोरड्यास, आमटी, कट, शेरवा, तर्री, शॅम्पल यातला फरक कळायला महाराष्ट्र
उभाआडवा बघावा लागतो. खेकडा कुठला आणि चिंबोरी कुठली? उंबर कुठलं आणि
दोड्या कुठल्या? शाळू, ज्वारी आणि हायब्रीड यातला पोटभेद कळायला रानातली
मराठी लागते. कडवाळ कुठलं न मका कुठली हे शेरातला शाना कदीबी सांगू शकत
नाय!
खाण-पिणं असू द्या, जनावरं-जित्राब असु द्या, शिव्याशाप असू
द्या, लाडाची नाव असू द्या, वेळ-काळाची गणित असू द्या, हुमान-कोडी असुद्या,
ओव्या-अभंग असू द्या, अंगाई असू द्या, सणवार असू द्या, झाडाझुडुप असू
द्या, शेतीची औजार असू द्या, कापडं-चोपड असू द्या नाहीतर अजून काही, मराठी
प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक गावात, शहरात, कामात, धंद्यात ...
सगळीकडे मराठीचा वेगळा बाज असतो, अंदाज असतो आणि लकब असते. दिवसातन 5 वेळा
कपडे बदलणाऱ्या अवखळ, सुकुमार पोरीसारखी ही भाषा सगळीकडे नवनवे रंग उधळत
असते.
माय मराठी... तुझ्यावर लय जीव आहे बाये!!! अशीच उंडारत राहा... वारं पिलेल्या खोंडासारखं!!
- डॉ. विनय काटे
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग http://ift.tt/2CMjTC1
via
IFTTT